Monday, March 17 2025 11:39 pm

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार व प्रांताध्यक्ष ना जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उस्मानाबाद येथील नेते दिग्विजय शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला

त्यांच्यासह राजेंद्र झांबरे, मिलिंद कांबळे, डी. टी. कांबळे, आनंद पाटील, गोपाळ घोडके व इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मा. सुरेश बिराजदार यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला.

श्री. दिग्विजय शिंदे यांचे पक्षात स्वागत करताना मा. ना. अजितदादा पवार म्हणाले, “इतकी वर्षे एका पक्षात लोकसेवा करून त्यानंतर वेगळी भूमिका स्वीकारणे हे अवघड काम आहे. तरी देखील दिग्विजय शिंदे यांनी हे आव्हान स्वीकारले. उस्मानाबाद जिल्ह्यात पक्षाचे अनेक पदाधिकारी काम करतात, दिग्विजय यांच्या येण्यामुळे पक्षाची ताकद अधिक वाढेल.” असा विश्वास ना. अजितदादांनी व्यक्त केला. या भागात आर्थिक सुबत्ता यायला हवी, यासाठी काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत निर्णय घेतला आहे. या भागात पाण्याशिवाय दुसरा कोणताही महत्त्वाचा विषय नाही, याची आम्हाला जाणीव आहे. तसेच या भागातील युवकांना त्याच भागात रोजगार मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असून त्या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू आहे, असे ना. अजितदादा म्हणाले.

आपल्या पक्षात कुठेही भेदभाव होत नाही. तुम्ही तुमचे कौशल्य दाखवले की त्यानुसार संधी मिळत असते. मराठवाड्यातील तरुण सहकारी श्री. धनंजय मुंडे यांनी पक्षात प्रवेश केल्यावर त्यांना आमदारकीची संधी मिळाली व पुढे काम करता आले. श्री. दिग्विजय शिंदे यांचेही भविष्य उज्ज्वल आहे, हा विश्वास आहे. तुम्ही उत्तम प्रकारे काम करून लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मा. अजितदादा यांनी केले. या पक्षप्रवेशाने उस्मानाबाद जिल्ह्यात पक्षाची ताकद अधिक वाढविण्यासाठी चांगले वातावरण तयार होईल. तुम्हा सगळ्यांना पक्षात चांगली वागणूक मिळेल असा विश्वास ना. अजितदादा यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. उस्मानाबाद जिल्हा हा आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी आम्ही काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. कृष्णा नदीचे पाणी इथे घेऊन येण्यासाठी होणारा प्रकल्पाचे जोमाने काम सुरू करण्यात येत आहे. आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाणी पोहचविण्याचा प्रयत्नात आहोत. यातून जो दुष्काळी भाग आहे, जो पाण्यापासून वंचित आहे त्यासाठी लवकरात लवकर पाणी मिळण्यासाठी प्रकल्पाला गती देण्याचे काम होईल. तसेच २०२४च्या अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

श्री. दिग्विजय शिंदे हे एक युवा नेता ज्यांनी अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम केलं आहे. सुशिक्षित पदवीधर आणि पक्षसंघटनेत बराच काळ काम केलेला नेता भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादीत येतोय, त्याबद्दल त्यांचे स्वागत आहे. त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाची आहे. कोरोना काळात लोकसेवा करण्याचे काम त्यांनी उत्साहाने केले. त्यांनी ठाम निर्धार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांपासून फारकत घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवार साहेबांचा विचार पटल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे ना. जयंतराव पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काम करणाऱ्या आणि योग्य जनाधार असलेल्या नेतृत्त्वाला अधिक प्रोत्साहन देण्याचे काम आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष करतोय. उस्मानाबाद जिल्ह्यात आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. तुम्हा सर्वांच्या येण्याने उस्मानाबाद जिल्ह्यात पक्षाला अधिक ताकद मिळाली आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार राहुल मोटे तसेच पक्षाचे उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.