Saturday, January 18 2025 5:20 am
latest

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर मतदारसंघातील 137 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ठाणे 01- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी गृहनिर्माण मंत्री , आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर (जि). अध्यक्ष सुहास देसाई , कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली, १४८ ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील 137 पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

ठाणे शहर मतदारसंघ अध्यक्ष महेंद्र पवार यांनी शनिवारी आपली कार्यकारिणी जाहीर केली. ही कार्यकारिणी जाहीर करताना पक्षसंघटनेची बुथ निहाय रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, ब्लॉक अध्यक्ष, ब्लॉक उपाध्यक्ष, सोशल मिडीया समन्वयक, प्रभाग अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रभाग सरचिटणीस आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवाध्यक्ष विक्रम खामकर, विधानसभाध्यक्ष महेंद्र पवार, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे, यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेवर चालणारे सैनिक तथा आपले नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. जे लोक पद, पैसा आणि सत्ता बघतात ; त्यांच्याकडे निष्ठा नसते. त्यांना मिळणारे यश आणि प्रतिष्ठा क्षणभंगुर असते. पण, आपण सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत. आपल्याला आता संघर्ष करावा लागला तरी हरकत नाही. पण, या संघर्षातूनच चांगले काही तरी घडणार आहे. आपणाला पद नाही जबाबदारी मिळालेली आहे, ही जबाबदारी आपण पार पाडून महाविकास आघाडीचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा निर्धार करू या, असे सांगितले.