Tuesday, March 18 2025 12:38 am

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

२३व्या वर्षात नगरसेवक संख्या २३ ने वाढविण्याचा निर्धार.

ठाणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात ठाणे, पालघर जिल्हा समन्वयक तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे, पालघर महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री ना.डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठामपाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या २३ ने वाढवून ५९ वर नेण्याचा निर्धार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, उपस्थित कार्यकर्त्याकडून परांजपे यांच्या या निर्धाराचे स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश चिटणीस सुहास देसाई, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, सामाजिक न्याय विभागाचे कैलास हावळे,ओबीसी सेलचे गजानन चौधरी,अल्पसंख्यांक विभागाचे मुफ्ति अश्रफ, हुसेन मणियार, ज्येष्ठ नागरिक सेलचे दिलीप नाईक, लीगल सेलचे अॅड.विनोद ऊतेकर, असंघटित कामगार सेल चे राजू चापले,व्यापारी सेलचे दिपक क्षत्रिय,सोशल मीडियाचे जतीन कोठारी हे उपस्थित होते.

सकाळी १० वाजून १० मिनिटांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ऋताताई आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या ध्वजाचे आरोहन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आनंद परांजपे यांनी, आज आपण पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त एकत्र आलो आहे. केवळ वर्धापन दिन साजरा करून थांबायचे नाही.तर ठामपाची आगामी निवडणूक ताकदीने लढवायची आहे. महविकास आघाडीचा निर्णय ना.डॉ.जितेंद्र आव्हाड हे घेणार आहेत. पण, महाविकास आघाडीच्या भरवश्यावर आपण आपले काम थांबवायचे नाही. आपण सर्वांनी प्रभागनिहाय पक्ष वाढीसाठी संघर्षरत रहायचे आहे. महाविकास आघाडी झाली तर स्वागतच आहे. तरीही आपण सर्वांनी प्रत्येक प्रभागात जोरदार काम करायचे आहे. त्यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन प्रभाग रचनेनुसार व्यूहरचना आखण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ वा वर्धापन दिन साजरा केला असल्याने आता आपण २३ नगरसेवक वाढविण्यासाठी काम करायचे आहे, असे सांगितले.