Monday, April 6 2020 1:02 pm

राष्ट्रवादीने आयुक्तांची राजकीय दृष्टीकोनातून बदनामी करणार्‍यांचा केला निषेध

ठाणे (प्रतिनिधी)-  संपूर्ण दिवसात सुमारे 20-20 तास काम करणारे आयुक्त संजीव जयस्वाल हे ठाणे शहराची खरी ताकद आहे. त्यांच्यामुळेच विस्तीर्ण अशा ठाण शहरात विकासाची गंगा वहात आहे. ठाणेकर नागरिकांची जीवनशैली उंचावत आहे. अशा चांगल्या वातावरणात शहर विकसीत होत असताना दुधात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करु नये; तसा प्रयत्न केला तर आम्ही तो हानून पाडू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पाठिशी उभे राहण्याचा मानस एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, नगरसेवक सुहास देसाई, मुकूंद केणी, राजन किणे आणि शानू पठाण यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, ठाणे पालिकेतील सत्ताधार्‍यांमधील अंतर्गत भांडणे आता वृत्तपत्रांच्या माध्यमातून चव्हाट्यावर येत आहेत. विद्यमान नेतृत्व हे वाद शमवण्यात तोकडे पडत असल्याचे ज्यांनी आनंद दिघे यांना पाहिले आहेे; त्यांच्या दृष्टीपथास ते येत आहे.  त्यामुळे ठाणे शहराचा वेगाने होणारा विकास खुंटण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे शहरातील शिवसेनेतील ही दुफळी शहराच्या विकासाच्या आड येऊ नये, हीच आपली अपेक्षा आहे. पालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने 500 फुटांच्या घरांना करमाफीसारखी आश्वासने दिली होती. त्याची पूर्तता करण्यात अपयश आल्यामुळेच त्यांनी आता क्लस्टरचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. वास्तविक पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसनेच क्लस्टरसाठी आपल्याच सरकारच्या विरोधात लाँग मार्च, उपोषणे, धरणे आदी आंदोलने केली होती. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही योजना मंजूर करताना आ. जितेंद्र आव्हाड यांचे कौतूक करुन ही योजना त्यांच्या पाठपुराव्यामुळेच मंजूर झाली असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर इम्पॅक्ट असेसमेंट अहवालासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसनेच ताकद लावली होती. त्यात यश आल्याने उच्च न्यायालयाने हा अहवाल मंजुुर केला होता. आयुक्त जयस्वाल यांनी सादर केलेल्या सक्षम इम्पॅक्ट असेसमेंट अहवालामुळेच ठाण्यात ही योजना राबवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. हे सत्य लपवणे म्हणजे सूर्याला झाकण्यासारखा केवीलवाणा प्रयत्न करणे हाच आहे.  दिवसाला सुमारे 20 तास काम करुन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आनंद नगर ते नागला बंदर आणि खिडकाळी ते वागळे इस्टेट अशी विकासगंगा आणली आहे. ठाणेकरांची जीवनशैली बदलण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याला काहीजण विरोध करणार असतील तर तो राष्ट्रवादी हानून पाडेल, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.