Sunday, September 15 2019 3:28 pm

राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा मुहुर्त निश्चित

मुंबई : अखेर राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा मुहुर्त लागला. महाराष्ट्र राज्याच्या राज्य मंत्रीमंडळाचा १४ जून रोजी विस्तार होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात आता कुणा-कुणाला स्थान मिळणार आहे याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सर्वांना लवकरच खुशखबर मिळेल. शिवसेना आणि इतर मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेनुसार मंत्रिपदं मिळतील, असं मुनगंटीवार म्हणाले.

भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सहा जणांचा शपथविधी होणार असल्याची चर्चाही आहे, तर शिवसेनेची एकाच वाढीव मंत्रिपदावर बोळवण होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सहा आणि शिवसेनेचा एक मंत्री शपथ घेणार आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याचं म्हटलं जातं.

औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे किंवा प्रशांत बंब यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. बुलडाण्यातील जळगाव-जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागेल असा अंदाज आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेते आलेल्या जयदत्त क्षीरसागरांना शिवसेनेच्या कोट्यातून आरोग्यमंत्रीपद मिळू शकतं.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय सिंह मोहिते किंवा रणजित सिंह मोहिते या दोघांपैकी एकालाच पद मिळणार आहे. कुटुंबात एकाच व्यक्तीला पद द्यायचं, हे भाजपचं धोरण आहे. त्यामुळे आता विजयसिंह मोहितेंना राज्यपालपद दिलं जाऊ शकतं.

राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आणि गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक झाली. रणजितसिंह मोहिते पाटीलही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेले होते.