मुंबई 17 महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आली आहे. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात 40- 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मुंबई केंद्राने सोमवारी शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूक सुरळीत आहे.
आयएमडीने असे म्हटले आहे की, श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून उत्तर केरळ- कर्नाटक- महाराष्ट्र आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीने मच्छीमार समुदायासाठी नोटीस देखील जारी केली आहे आणि त्यांना पुढील पाच दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. किनारपट्टीवर मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला. कमाल आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरात 65.50 मिमी, 19.74 मिमी आणि 23. 56 मिमी पाऊस झाला आहे.