मुंबई, 2 : बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह व मानखुर्द येथील बालगृह येथे नव्याने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर राज्यातील बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचे केंद्र सुरू करणार आहोत. त्याचबरोबर भव्यता फाऊंडेशनच्या सहकार्याने डोंगरी व मानखुर्द येथील मुलांना त्यांचा कल लक्षात घेवून मानखुर्द आणि डोंगरी येथील मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती, कौशल्य, रोजगार व उद्योजकता आणि महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
डोंगरी, उमरखाडी येथील चिल्ड्रन एड सोसायटीमध्ये कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी बाल विकास पुणेचे विभागीय उपायुक्त राहुल मोरे, महिला व बालविकास कोकण विभागाचे उपायुक्त बापूराव भवाने, भव्यता फाऊंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष कुलीन मणियार, प्रशिक्षक वृंदा कोटक, सई अंबुकर उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, चिल्ड्रन एड सोसायटीच्या मानखुर्द येथील बालगृहामध्ये फॅशन डिझायनिंग, फ्रेम डिझाईनिंग, संगणक याचे कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. तर डोंगरी च्या निरीक्षण गृह येथे टाटा मोटर्सच्या माध्यमातून तीन महिन्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत यामध्ये मोबाईल दुरुस्ती, दुचाकी आणि इलेक्ट्रिकचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.बालगृहातील मुलांना शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे शिक्षण देण्यासाठी महिला बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. डोंगरी येथील निरीक्षणगृहातील मुलांसाठी सुरू असलेल्या संगणक प्रशिक्षण,सुतार प्रशिक्षण, शिवणकला, कला कुसरीच्या वस्तूंच्या घेतेलेल्या प्रशिक्षण वर्गासही मंत्री श्री.लोढा यांनी भेट दिली.
*भव्यता फाउंडेशनच्या माध्यमातून मानखुर्द आणि डोंगरी येथे समुपदेशन वर्ग सुरू करणार – कुलीन मणियार*
भव्यता फाउंडेशनचे संस्थापक श्री. मणियार म्हणाले, मानखुर्द आणि डोंगरी येथील बालकांचा कल लक्षात घेवून तसेच त्यांना समुपदेशनच्या माध्यमातून कौशल्य विकास व्हावा यासाठी भव्यता फाऊंडेशन चिल्ड्रन एड सोसायटीला सहकार्य करेल त्यासाठी संस्थेमार्फत दोन प्रशिक्षक देखील नेमण्यात आले आहेत, असेही श्री. मणियार म्हणाले.