Monday, April 21 2025 10:16 am
latest

राज्यातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा जाहीर

प्रथम पारितोषिक १ लाख रुपये
रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये

मुंबई 20 : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या बक्षीस रकमेच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक रु. १,००,०००/- (रुपये एक लाख) व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार), तृतीय पारितोषिक रु. ३०,०००/- (रुपये तीस हजार) अशी भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात येतील. तसेच, उत्कृष्ट कथेसाठी ०७ हजार रूपये, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक व उत्कृष्ट मुखपृष्ठ यांना प्रत्येकी ०५ हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास ७५०० रूपये अशी पारितोषिके आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास ४० हजार रूपये, व्दितीय क्रमांकास २० हजार रूपये आणि तृतीय क्रमांकास १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ०५ हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संपादक, प्रकाशकांनी दिवाळी अंकाच्या दोन प्रती व प्रवेश शुल्क रु.१००/- रोख, धनादेश अथवा डी.डी.द्वारे दिनांक १० डिसेंबर, २०२३ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि स्पर्धा समन्वयक शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे.
अंक पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष/कार्यवाह
मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान,
महापालिका मार्ग, सी.एस.टी., मुंबई – ४००००१.
फोन : ०२२-२२६२०४५१/२२७००७१५