‘उमेद’चा उपक्रम : विजेत्या स्पर्धकांसाठी लाखांची बक्षिसे
ठाणे (जि.प) : उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानातर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरूपात लोकांपर्यंत पोचविण्याच्या हेतूने दिनांक १ ते ३० जूनदरम्यान राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफीत निर्मिती स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी केले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठी व्यावसायिक हौशी ‘चित्रपट निर्माते, व्हिडिओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांना सहभागी होता येणार आहे.
राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये व सन्मान चिन्ह, तृतीय पारितोषिक एक लाख रुपये व सन्मान चिन्ह आणि उत्तेजनार्थ रुपये ५० हजार व सन्मान चिन्ह व सोबतच प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
चित्रफीत जिल्हास्तरावर सादर करण्याचा शेवटची तारीख १५ ‘जून आहे. या तारखेपर्यंत जिल्हा स्तरावर सहभागी एकूण स्पर्धकांपैकी उत्कृष्ट पाच स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच त्यांच्या चित्रफिती राज्य कक्षाकडे पाठवण्यात येतील आणि ३० जूनपर्यंत अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल.
चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त सात मिनिटे एवढा असावा, चित्रफीत ही एचडी दर्जाची असावी, चित्रफीत अप्रकाशित असावी. लघुपट निर्मिती व्यावसायिक, हौशी, स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्यासह सर्व सामान्य नागरिक यांनाही या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेचे विषय, नियम, प्रवेश अर्ज व इतर माहितीसाठी श्री. हसन तडवी (जिल्हा व्यवस्थापक) (मो. ८९२८१४०९२०) यांच्याशी कार्यालयीन वेळेत तसेच आपल्या तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,उमेद(Msrlm) पंचायत समिती येथे संपर्क करावा असे आवाहन विभागाने केले आहे.