ठाणे, 25 – मुख्य निवडणूक कार्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुंबईत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मतदार नोंदणी व निवडणूक कार्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांचा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन 2023 या कार्यक्रमाचे आयोजन एसएनडीटी महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर, उपसचिव मनोहर पारकर यांच्यासह मिलिंद बोकिल, सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, डॉ.सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, डॉ.उज्वला चक्रदेव आदी पाहुणे उपस्थित होते.
जिल्ह्यात सर्व घटकांच्या मतदार नोंदणीमध्ये जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत कोकण विभागातून ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिनगारे व उपजिल्हा निवडणूक श्रीमती अर्चना कदम (ठाणे) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच निवडणुकीचे वार्तांकन करून जनजागृती केल्याबद्दल ठाणे येथील दै. लोकसत्ताचे पत्रकार निखिल अहिरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
*ठाणे जिल्ह्याने केलेली उल्लेखनिय कामगिरी*
• दि. ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादीमध्ये ६१३४९५५ एवढे मतदार होते. दि. ०५ जानेवारी २०२३ रोजी मतदार नोंदणीमध्ये ७९५६२ ने मतदारांच्या संख्येत वाढ होऊन मतदारांची संख्या ६२१४५१७ इतकी मतदार नोंदणी करण्यात आली.
• दि. ०९ नोव्हेंबर २०२२ ते दि. ०८ डिसेंबर २०२२ या कालावधीत एकूण १७३८८ एवढी १७+ मतदारांची नोंदणी करण्यात आली.
• विशेष संक्षिप्त कार्यक्रम २०२३ दरम्यान १७+ भावी युवा मतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांच्या नोंदणीमध्ये १९३९४ इतकी वाढ झाली.
• ठाणे जिल्ह्यामध्ये असंरक्षित आदिवासी गटातील मतदार हे दुर्गम भागामध्ये पाड्यामध्ये रहिवास करत असतात. त्यामुळे अशा गटातील मतदारांची नोंदणी ही आव्हानात्मक असताना देखील ४३३१ इतक्या मतदारांची नोंदणी करण्यात आली.
• ठाणे जिल्ह्यामध्ये महिला बचतगटाच्या माध्यमातून महिला मतदारांच्या संख्येमध्ये ४०२२६ ने वाढ होऊन जिल्ह्याचा लिंग गुणोत्तर प्रमाण (जेंडर रेशो) ८४३ वरून ८४५ एवढा झाला.
• ठाणे जिल्हा तृतीयपंथी मतदार नोंदणीमध्ये प्रथम क्रमांकावर असून दि. ०९ नोव्हेंबर २०२२ पासून ते दि. ०५ जानेवारी २०२३ रोजीपर्यंत तृतीयपंथी मतदारांची २२५ नी वाढ होऊन १०७८ एवढी नोंदणी झाली आहे.
• मतदार नोंदणीमध्ये देह विक्री करणाऱ्या महिलांची ओळख गुप्त ठेवून १२४०१ एवढी मतदार नोंदणी झाली.
• बेघर मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून १६० इतकी बेघर मतदारांची नोंदणी करण्यात आली.
• ठाणे जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान दिव्यांग मतदारांच्या नोंदणी मध्ये एकूण १०४५ ने वाढ होऊन दिव्यांग मतदारांची संख्या ही ३२१३२ इतकी झाली आहे.