मुंबई, 01 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस राजभवन येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.
केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत विविध राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे करण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून मंगळवारी (दि. ३१) जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्र शासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांत काश्मीर शांतता आणि समृद्धीच्या दिशेने सातत्याने प्रगती करत आहे. देशातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक जम्मू-काश्मीर आणि लडाखला जात आहेत. महाराष्ट्रात देखील जम्मू, काश्मीर आणि लडाखमधून अनेक विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. विकास व व्यापार वृद्धीचे नवीन मार्गही वेगाने उघडत आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या युवकांसाठी नव-नव्या संधी निर्माण होत आहेत. ही सकारात्मक बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले. केंद्रशासित प्रदेश स्थापना दिनानिमित्त सर्वांनी सुसंवादी आणि सर्वसमावेशक भारताच्या निर्मितीसाठी एकजूट झाले पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले.
जम्मू आणि काश्मीरच्या संस्कृतीत संगीत, नृत्य, सण, साहित्य, पाककृती यांना महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू धर्म, सूफी आणि बौद्ध धर्माचा सांस्कृतिक वारसा असलेला हा अद्वितीय प्रदेश आहे. येथे सर्व धर्माचे लोक सर्व सण समान उत्साहाने साजरे करतात, असे राज्यपालांनी सांगितले.
केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस हा औपचारिक उत्सव न राहता तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी समर्पित होण्याचा दिवस असला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी लडाख येथील पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आलेल्या कलाकारांच्या चमूने तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी व युवा कलाकारांनी जम्मू व काश्मीर तसेच लडाखच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम सादर केला. लडाखचे जाब्रो लोकनृत्य, हाफिजा नृत्य, कव्वाली, माता वैष्णोदेवी गीत, लोकवाद्य संगीत आदी कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले.
राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविक केले, तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला राज्यपालांचे विशेष सचिव विपीनकुमार सक्सेना, मुंबई विद्यापीठाचे अधिकारी, निमंत्रित तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.