Friday, December 13 2024 11:37 am

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातील नुतनीकरणाच्या कामाचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा

26 सप्टेंबरपर्यत काम पूर्ण करण्याचे निर्देश

ठाणे (03) – ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृह नुतनीकरणाचे काम सुरू असून या कामाची पाहणी मंगळवारी (01 ऑगस्ट) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिका-यांसमवेत केली. वसतीगृहाच्या खोल्यांची रचना कशी असेल यासाठी अद्ययावत अशी एक रुम तयार करण्यात आली आहे. या रुमची पाहणी करीत असताना वसतीगृहातील इतर रुमही अशाच पध्दतीने तयार कराव्यात. तसेच येत्या 26 सप्टेंबरपर्यत सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करुन काम करावे असे निर्देश आयुक्तांनी आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी दिले.

महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी भेट दिली होती. यावेळी वसतीगृहाची दुरावस्था त्यांनी पाहून तेथील मुलांशी संवाद साधून सोईसुविधाबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. सद्यस्थितीबाबत सर्व प्रशिक्षणार्थींनी वसतीगृह तसेच कॅन्टीनच्या समस्या त्यांच्याजवळ मांडल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी निर्देश देवून अत्यंत चांगल्या अत्युच्च दर्जाच्या सेवासुविधा निवासी डॉक्टरांना उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे असलेल्या वसतीगृहाच्या इमारत नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचे वसतीगृह हे दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल या दृष्टीने जास्तीचे मनुष्यबळ वापरुन काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

रुग्णालयामध्ये ज्या सेवा पुरविल्या जातात त्यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची फार मोठी भूमिका असते. वैद्यकीय महाविद्यालय असणाऱ्या रुग्णालयातील रुग्णसेवेचा कणाच निवासी वैद्यकीय अधिकारी असतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासाची व्यवस्था ही अत्युच्च दर्जाची असल्याने त्याचा थेट परिणाम रुग्ण्सेवा सुधारण्यावर होणार आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहामध्ये होत असणाऱ्या सुधारणा या विशेष महत्वाच्या ठरतात असे आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

वसतीगृहाचे काम सुरू करण्यापूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे, त्यानुसार इमारतीतील कॉलम्स, बीम, स्लॅब आदीची डागडुजी करताना वापरण्यात येणारे साहित्याचा दर्जा हा अत्युच्च असावा. तसेच इमारतीतून गळती होणार नाही या दृष्टीने काम करण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या. पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आलेल्या रुममध्ये दोन बेडस्, फर्निचर, अभ्यास करण्यासाठी टेबल, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आले असून या संपूर्ण खोलीची पाहणी यावेळी करण्यात आली. या वसतीगृहात एकूण 53 रुम असून प्रत्येक रुममध्ये दोन विद्यार्थी अशा एकूण 106 विद्यार्थी व निवासी डॉक्टरांची सोय होणार आहे. वसतीगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये भरपूर उजेड येईल अशी रचना असावी, रुममधील फरशी, रंग याबाबतची निवड तसेच उघडझाप करता येतील असे पडदे, चार्जिंगची सुविधा आदी उपलब्धतता याबाबत योग्य ते निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.

येत्या 26 सप्टेंबरपर्यत सर्व कामे पूर्ण होणे आवश्यक असले तरी वापरण्यात येणारे साहित्य व कामाचा दर्जा हा अत्युच्च राहिल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या. काम पूर्ण करताना ज्या कामांसाठी जितका वेळ लागणार आहे तितका तो देण्यात यावा. उदा. प्लॅस्टर केल्यानंतर त्यावर लगेच रंगरंगोटी करु नये. इमारतीतील अंतर्गत भागाची दुरूस्ती, स्नानगृह, शौचालयांची पुरेशी संख्या आदी बाबींचा आढावा आयुक्त श्री. बांगर यांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान घेतला.

रुग्णालयांच्या दुरूस्तीची प्रक्रिया सुरू करावी.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून लवकरच रुग्णालयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यापूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ऑडिटनुसार इमारतीची दुरूस्ती हाती घेण्यात यावे, या मध्ये कोणत्याही प्रकारे सद्यस्थितीतील रुग्णांना अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने एकेक मजल्याचे काम हाती घेवून ते पूर्ण करावे, जेणेकरुन रुग्णालय सुरू राहून आवश्यक काम करणे सोईचे होईल. शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीमधून काम करावयाचे असून खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विनियोग रुग्णालयाची भौतिक परिस्थिती सुधारण्यामध्ये झाला पाहिजे याकडे कटाक्ष असावा असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.

या पाहणीदौऱ्यास उपायुक्‌त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, उपनगरअभियंता रामदास शिंदे, शुभांगी केसवाणी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.