Tuesday, November 12 2024 10:55 am

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे व्याख्यान

• सोमवार, २६ जून रोजी, सायंकाळी ६ वाजता. स्थळ – काशिनाथ घाणेकर नाट्यगृह
• ठाणे महानगरपालिकेची ‘मंथन व्याख्यानमाला’

ठाणे (२०): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोमवार, २६ जून रोजी ठाणे महापालिकेच्या ‘मंथन व्याख्यानमाले’त ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य आणि विचार’, या विषयावर इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सोमवार, २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार असून ते सगळ्यांसाठी खुले आहे.
महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे छत्रपती, थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण आदी सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४९वी जयंती २६ जून रोजी साजरी होत आहे. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्याचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहू महाराजांनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी यासाठी त्यांनी कोल्हापुरात वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नाशिक, पुणे, नगर, नागपूर आदी ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू महाराज हे देशातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे त्यांनी आपले जीवित कर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूमही जारी केले.
सामाजिक सुधारणांबरोबरच शाहू महाराजांनी शेती व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपूरी, जयसिंगपूर यासारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली.
शाहू महाराजांनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली.
वक्ते – इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव
‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य आणि विचार’ यांचा परिचय व्हावा यासाठी इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव मूळचे कोल्हापूरचे आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रातील डॉ. जाधव यांची हातोटी विद्यार्थ्यांनी अनुभवली आहे. त्यांच्या पीएचडीचा शोधप्रबंध महात्मा ज्योतीराव फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवर आधारित होता.‌ विद्यार्थ्यांना घडवत ते पुस्तके लिहीत राहिले. ‘शाहू गौरव ग्रंथ’ व ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
मंथन व्याख्यानमाला
ठाणे महापालिकेच्यावतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘मंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. महनीय व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत. तसेच, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे ‘मंथन व्याख्यानमाले’चे प्रयोजन असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले.