Saturday, April 20 2019 12:25 am

रस्त्यांवरील ट्रॅफिक जाममुळे किडनीच्या विकारांमध्ये होणार वाढ नवी मुंबईतील डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

नवी मुंबई : आजमितीला सध्या सर्वात जास्त चर्चेत कोण असेल तर ते  सायन पनवेल महामार्गावरील खड्डे .पनवेल ते वाशी हे अंतर अवघ्या २० ते २५ मिनटात पार करणाऱ्या कारचालकांना हेच अंतर पार कारण्यासाठे तब्बल तीन  ते चार तासाचा वेळ लागत आहे.  कळंबोली, खारघर नेरुळ  व तुर्भे येथे अतीवृष्टीमुळे महामार्गावर खड्डे पडले असून गाडीचा स्पीड ७० ते ८० वरून थेट  १० ते २० वर आला आहे. थोड्या दिवसांनी सरकारतर्फे हे खड्डे बुजविले जातील व रस्ता पूर्वपदावर येईल परंतु असा सलग ३ ते ४ तासाचा  प्रवास कदाचीत तुमच्या शरीरातील मूत्रपिंडाचे म्हणजेच  किडन्यांचे आरोग्य बिघडवू शकतो अशी भीती नवी मुंबईतील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ. सौम्यन डे सांगतात, ” मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण किंवा ज्यांना मूत्रपिंडाला पूर्वी जंतूसंसर्ग होऊन गेला आहे किंवा मूतखडा झालेला आहे अशा  नागरिकांना लघवी  तुंबविल्यामुळे किडनीला जंतुसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो व यामध्ये महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे. ट्रॅफीक जाममुळे  तुम्ही तुमच्या ऑफिसला अथवा कामाच्या ठिकाणी दोन ते तीन तास उशीरा पोहचता अशावेळी तुमची ब्लॅडर म्हणेजच मूत्र साठविण्याची पिशवी भरून जाते व त्यामुळे मूत्रपिंडाला जंतुसंसर्गाचा त्रास होण्यास सुरुवात होते व हीच जीवनशैली जर जास्त दिवस राहिली तर तुम्ही नक्कीच आजारी पडू शकता.”

तेरणा  स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे जेष्ठ मूत्रविकारतज्ञ डॉ. अमित भोईर म्हणाले, ” पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरातून घामाचे प्रमाण कमी असते त्यामुळे मूत्र पिशवी लगेच भरते व ते मूत्र जर योग्य वेळी शरीराच्या बाहेर गेले नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात.  घरात मूत्रपिंडाचा आजार असेल किंवा लहानपणी मूत्रपिंड विकार होऊन गेला असेल, मुतखडा, लघवीचा जंतूसंसर्ग असेल किंवा अंगावर सूज येत असेल अशा नागरिकांना या ट्रॅफीक जामचा नक्कीच त्रास होणार आहे. सायन पनवेलच नाही तर भारतातील सर्वच महामार्गांवर वाहनांची संख्या वाढली असून ” ट्रॅफीक जाम” हा एक राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाला आहे. कार पुलिंग ( कार शेयर करणे ) पब्लीक ट्रान्स्पोर्टचा वापर करणे हेच या प्रश्नांवर सध्या उत्तर असून याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता आणणे गरजेचे आहे असे मत मूत्रविकारतज्ञ डॉ. अमित भोईर यांनी व्यक्त केले.