ठाणे 15 :- रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जागा मोकळ्या असणे गरजेचे आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर भंगार अवस्थेतील गाड्या उभ्या केलेल्या असल्यामुळे याचा त्रास नागरिकांना व वाहतूकीस होवून परिसरात वाहतूक कोंडी होत असते. यासाठी रस्त्याच्या कडेला भंगार अवस्थेतील गाड्या नजरेस पडल्या तर त्या तात्काळ उचलण्याची कारवाई करण्यात यावी असे निर्देश् महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.
नुकतीच मुलुंड चेकनाका, श्रीनगर रस्त्यांवरील भंगार गाड्या उचलण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
श्रीनगर पोलीस चौकी येथील रस्त्यांवर अनेक महिन्यांपासून भंगार अवस्थेतील चारचाकी व दुचाकी गाड्या उभ्या केलेल्या असल्याच्या तक्रारी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या गाड्यामुळे परिसरातील वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता तसेच नागरिकांना देखील येथून जाणे व परिसराची स्वच्छता करणे त्रासाचे होत होते. आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीत सहाय्यक आयुक्त व स्थानिक पोलीसांच्या मदतीने सदरच्या भंगार गाड्या उचलण्याची कारवाई करण्यात आली. यात 4 चार चाकी गाड्या व 10 दुचाकी उचलल्यामुळे या ठिकाणच्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या शौचालयांची नव्याने पुर्नबांधणी केली जाणार असून श्रीनगर पोलीस चौकी परिसरही सुशोभित केला जाणार असल्याचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नमूद केले.
भंगार अवस्थेतील कारवाई करण्यात आलेली वाहने बाटा कंपाऊंड येथे जमा करण्यात आली आहेत. यापुढे शहरात कुठेही भंगार अवस्थेतील गाड्या रस्त्यांच्या दुतर्फा अनेक दिवसांपासून उभ्या असतील त्या तातडीने हटवून नागरिकांना परिसर मोकळा करुन द्यावा अशा सूचना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी संबंधित उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.
संपूर्ण शहरात वेळोवेळी ही कारवाई सुरू रहावी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तिन्ही परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत. तसेच नागरिकांनीही याबाबत काही तक्रारी असतील तर आपत्कालीन विभागाशी 8657887101 / 8657887102 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.