Thursday, December 12 2024 7:15 pm

रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वक व्हावीत यासाठी ठामपाच्या अभियंत्यांना आयआयटी मार्फत मार्गदर्शन

ठाणे 06 : ठाणे महापालिका हद्दीमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी ठाणे महापालिकेने आय.आय.टी. मुंबई यांची नेमणूक केली आहे. रस्त्यांची कामे करताना रस्त्यांच्या कामाचे गुणवत्ता मुल्यांकन, गुणवत्ता नियंत्रण, कामे करावयाची पध्दत व तांत्रिक बाबींबाबतचे मार्गदर्शन ठाणे महानगरपालिकेचे अभियंते, ठेकेदार यांना नुकतेच आय.आय.टी. मुंबईच्या तज्ज्ञामार्फत करण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेच्या अर्बन रिसर्च सेंटर येथे मंगळवारी [4/4/2023] या मार्गदर्शन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आय.आय.टी. मुंबईचे उपसंचालक प्रा. श्री. के.व्ही. क्रिष्णा राव, सहयोगी प्रा. श्री. पी. वेदागीरी, प्रा. सोलोमन देबार्मा यांनी ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांना व ठेकेदारांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे महापालिकेचे नगरअभियंता प्रशांत सोनग्रा यांनी आय.आय.टीच्या प्राध्यापकांचे स्वागत केले.

ठाणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या टप्पा 1 मध्ये 214 कोटी व टप्पा 2 मध्ये 391 कोटीची रस्त्यांची कामे सुरू आहेत. या सर्व रस्त्यांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण करणेसाठी आयआयटी मुंबई यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कामांमध्ये प्रामुख्याने डांबरीकरण, मास्टीक,युटीडब्ल्युटी व सिमेंट काँक्रिटीकरण पध्दतीने रस्ते तयार करण्याचे काम प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील अभियंते व ठेकेदारांसाठी या मार्गदर्शन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

रस्त्याची कामे करताना त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा कसा ओळखावा, कामाचे गुणवत्ता मुल्यांकन, गुणवत्ता नियंत्रण तसेच कशा करण्याची योग्य पध्दत, रस्त्यांसाठी करावयाच्या चाचण्या, वातावरण व तापमान यांचा होणारा परिणाम, काम गुणवत्तापूर्वक होण्यासाठी करावयाच्या इतर बाबी, तांत्रिक बाबींचे विश्लेषण व इतर अनुषंगिक बाबींबाबतचे मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण वर्गास ठाणे महानगरपालिकेचे जवळपास 100 अभियंते, 20 ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी होते. रस्त्यांच्या कामांबाबत मार्गदर्शन केल्याबद्दल आयआयटीच्या प्राध्यापकांचे व उपस्थितांचे उपनगरअभियंता रामदास शिंदे यांनी आभार व्यक्त केले.