Friday, December 13 2024 12:06 pm

रस्ते दुरूस्ती साठी मास्टिक तंत्र ठरते फायदेशीर – आयुक्त अभिजीत बांगर

*रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक तंत्र ठरते आहे फायदेशीर*

• *१२ तासात खड्डे भरण्याचे सूत्र इतर यंत्रणांनीही स्वीकारण्याची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची सूचना*

*ठाणे (११) :* रस्ते दुरुस्तीसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात मास्टिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्याचा आतापर्यंत चांगला परिणाम दिसला असून मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांनीही तोच पर्याय वापरावा आणि रस्ता खराब असल्याचे आढळल्यापासून १२ तासांच्या आत त्या रस्त्याची दुरुस्ती केली जावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेसह निरनिराळ्या सरकारी संस्थांकडे रस्ते आणि पूल यांचे व्यवस्थापन आहे. मात्र रस्ता खराब झाल्याचे निदर्शनास आल्यावर कोणाचीही वाट न पाहता सर्वप्रथम नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तो रस्ता दुरुस्त केला जावा, असे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी यापूर्वीच महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. रस्त्यावरील खड्डा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेऊन खड्ड्यांबद्दल पराकोटीची असहनशीलता (intolerance) ठेवा आणि काम करा, याचा पुनरुच्चार आयुक्तांनी सर्व यंत्रणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत केला.

आपापल्या हद्दीतील सर्व रस्त्यांची पाहणी करून आवश्यकता असेल तिथे दुरुस्तीचे नियोजन करावे. दुरुस्ती झाल्यावर स्वतः प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी, अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. त्याचबरोबर, इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीही आपापल्या रस्ते हद्दीत काटेकोर सर्वेक्षण करावे, अशी अपेक्षा आयुक्त श्री. बांगर यांनी व्यक्त केली.

ना दुरुस्त रस्त्यांबद्दल नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. त्या भावना योग्यच आहेत. आपण त्याची दखल घेवून सतर्क राहायला पाहिजे. रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्याबद्दल आपण नागरिकांच्या प्रती उत्तरदायी आहोत, याची सर्व यंत्रणांनी जाणीव ठेवावी. लोकांना त्रास होण्यापूर्वीच रस्ते दुरुस्तीची कारवाई झाली पाहिजे. सर्व यंत्रणा सजग असून तत्काळ कारवाई होत असल्याचा विश्वास नागरिकांना वाटला पाहिजे, असे प्रतिपादन आयुक्त श्री. बांगर यांनी केले.

*मास्टिकचा वापर करावा*

महापालिकेतर्फे रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक पध्दतीचा अवलंब करीत आहे. डांबरीकरणात मास्टिक हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. डांबराचे तापमान १८० ते २०० डिग्रीपर्यंत असते. त्याचा सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे. तसेच, ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले तेथे चांगला परिणाम दिसला आहे. कोल्डमिक्स पद्धतीने केलेली दुरुस्ती अतिवृष्टीत टिकत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्याशिवाय, मास्टिक हे कोल्डमिक्सपेक्षा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी त्याचा वापर करावा, अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

मेट्रो मार्ग हा एकरेषीय आणि रस्त्याच्या ठराविक भागात आहे. त्यामुळे त्या खालील रस्त्याचे नियोजन इतर रस्त्यांच्या तुलनेने सोपे आहे. मेट्रोची यंत्रणा आणि उपलब्ध साधन सामुग्री लक्षात घेता त्यांनी रस्ते दुरुस्तीचा आदर्श घालून द्यावा. म्हणजे इतर यंत्रणांना त्या कामाचा दाखला देऊन तसे काम करून घेता येईल, असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

मेट्रोचे काही ठिकाणी अजूनही बॅरिकेड्स दिसत आहेत. स्टेशन बांधकाम क्षेत्र सोडून इतर ठिकाणी शक्य असेल ते सर्व बॅरिकेड्स हटवावे. तसेच, ज्या भागात आता खोदकाम अर्धवट आहे तिथे काम थांबवून रस्ता वाहतूक योग्य करावा. पाण्याचा निचरा जलद होईल याचीही दक्षता घेतली जावी, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.

रस्ते दुरुस्तीसाठी कोल्ड मिस्क न वापरता मास्टिक वापरावे, पावसाळा असल्याने नवीन कोणतेही खोदकाम करू नये, तसेच सगळे रस्ते वाहतूक योग्य राहतील आणि खड्डा दुरुस्त करताना नीट चौकोन आखून करावा, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले. पेव्हर ब्लॉकचा वापर करू नका. त्यामुळे रस्त्याचा उंचसखलपणा वाढतो आणि पाणी साठून आणखी नुकसान होते, असेही आयुक्त श्री. बांगर म्हणाले.

नितीन कंपनी-कॅडबरी जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा उड्डाणपूल, भिवंडी – नाशिक रोड, घोडबंदर रोड, वाघबीळ येथील रस्ते स्थितीवर एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने बारीक लक्ष ठेवावे. विशेष करून नाशिक रोडची दुरुस्ती तात्काळ करावी. तेथे वाहतूक कोंडी झाली की त्याचा थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर होतो, असे आयुक्त श्री. बांगर यांनी निदर्शनास आणले.

या बैठकीस नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, महापालिकेचे कार्यकारी अभियंता, यांच्यासह मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी यांचे अधिकारी उपस्थित होते.