मुंबई, 20 : पनवेल तालुक्यातील अमेटी युनिव्हर्सिटी भाताण तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील कंपन्याकडून ग्रामपंचायतीच्या थकीत कराची वसुली कमी झाली आहे. कर थकविणाऱ्या कंपन्या तसेच अमेटी युनिव्हर्सिटीवर कडक कारवाई करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य महेश बालदी यांनी पनवेल तालुक्यातील रसायनी पातळगंगा औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या तसेच अमेटी युनिव्हर्सिटी भाताण यांच्यामार्फत मालमत्ता कर ग्रामपंचायतीला दिला नसल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, अमेटी युनिव्हर्सिटी यांच्याकडील करपात्र इमारतीवरील कर वसुलीसाठी ग्रामपंचायत भाताण यांनी कर वसुलीची कार्यवाही सुरू केली आहे. कर वसुली कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे किंवा नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अडचणी आलेल्या नाहीत. जास्तीत जास्त कर वसुली करण्याबाबत ग्रामपंचायत व औद्योगिक विकास महामंडळाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य दिलीप वळसे पाटील, प्रशांत ठाकूर, ॲड.यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला.