Monday, September 28 2020 2:05 pm

रशियाची घोषणा : अखेर कोरोनावर लस आली

मुंबई : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी कोरोनाची पहिली वहिली लस तयार केल्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर ही लस त्यांच्या मुलीलाही देण्यात आल्याचे पुतिन म्हणाले आहेत. मंगळवारी सरकारी प्रतिनिधींच्या बैठकीत पुतिन यांनी ही माहिती दिली. रशियाने तयार केलेली लस कोरोनावर प्रभावी असून विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी लस फायदेशीर ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लवकरच ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता जगातले इतर देश काय भूमिका घेतात? रशियाकडून ही लस घेतली जाते का? तसेच, इतर देशांमध्ये संशोधन सुरू असलेल्या लसींबाबत काय होणार? हा चर्चेचा मुद्दा ठरू लागला आहे. मात्र, रशियाने बनवलेली लस WHO कडून मान्यता मिळाल्याशिवाय इतर देशांकडे पाठवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.

रशियाच्या गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्या सुरु राहणार असल्या तरी सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला करोना व्हायरसवरील लसीची निर्मिती करायची होती. त्या दृष्टीने रशियाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबरपासून या लसीची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस आहे.