Friday, December 13 2024 11:10 am

योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयामुळे योग व निसर्गोपचार शिक्षणास मिळणार चालना

मुंबई, 11 : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्न ६० रुग्णखाटांच्या रुग्णालयास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे योग व निसर्गोपचार शिक्षणास चालना मिळणार आहे.

नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयासाठी एकूण रु. 182.35 कोटी इतका खर्च अपेक्षित असून आवश्यक निधी उपलब्ध करुन घेण्यास व त्याप्रमाणे खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पाचव्या वर्षानंतर पुढील प्रत्येक वर्षी आवश्यक आवर्ती खर्चासाठी प्रति वर्ष सुमारे रु. 19.67 कोटी इतका निधी उपलब्ध करुन देऊन खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत राज्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी बॅचलर ऑफ योगा ॲण्ड नॅचरोपॅथी (बी.एन.वाय.एस.) साठी विहीत केलेला पदवी अभ्यासक्रम कोणत्याही संस्थेमार्फत सुरु नाही. यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

त्याप्रमाणे प्रस्तावित केल्यानुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नत ६० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली .