Friday, April 19 2019 11:49 pm

येरवडा कारागृहाचा कैदी अंबरनाथमधून फरार गुन्हा दाखल

ठाणे – जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला १४ दिवसाच्या संचीत रजेवर सोडण्यात आले होते. पण, रजा संपल्यानंतरही तो पुन्हा येरवडा कारागृहात परतला नाही. त्यामुळे पलायन केलेल्या त्या कैद्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडप्पा पुजारी (३७) असे पलायन केलेल्या कैदीचे नाव आहे. तो अंबरनाथ येथील बुवापाडा परिसरात राहतो. दंडप्पा याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला १४ दिवसांच्या संचीत रजेवर सोडण्यात आले होते. त्यानंतर १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात त्याने हजर होणे अपेक्षीत होते. पण, तेव्हापासून तो कारागृहात हजर झालाच नाही.
कैद्याने पलायन केल्यामुळे तुरूंगरक्षक जितेंद्र बांदल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.