Saturday, January 18 2025 6:16 am
latest

येऊरमधील हॉटेल्सना अग्निसुरक्षा नाही

ठाणे,05 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर गावामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या हॉटेल, बँक्वेट हॉल आणि रेस्टॉरंट्सना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कोणत्याही प्रकारचे परवाने देण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी यासंदर्भात अग्निशमन विभागाकडे प्रश्न विचारला होता.त्याला उत्तर देताना या व्यावसायिक आस्थापनांना परवाने देण्यात आले
नसल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राशिवाय सुरू असलेली ही हॉटेले नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप स्थानिक आदिवासींकडून करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यावर कारवाई
करण्यात यावी, यासाठी स्थानिक आदिवासी आणि शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.
येऊरचा हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने वेढलेला असून हा
भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करण्यात आला आहे. या परिसरामध्ये अनेक बिबळे आणि अन्य वन्यजीवांचा संचार मुक्तपणे असतो. या भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल आणि हॉटेले उघडली जात आहेत. परंतु अशा वास्तूंचा व्यावसायिक वापर करण्यापूर्वी ‘महाराष्ट्र अग्निरोधक आणि जीवन सुरक्षा उपाय अधिनियम २००६ नुसार अग्निशमन विभागाकडून आवश्यक परवानग्या घेणे क्रमप्राप्त असते. परंतु अशा परवानग्यांशिवाय ही हॉटेले सुरू असून त्यांच्यावर महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. माहिती अधिकार
कार्यकर्ता अजय जया यांनी यासंदर्भात माहिती अधिकारामध्ये अग्निशमन विभागाकडून देण्यात आलेल्या ना हरकत दाखल्यांच्या प्रतींची मागणी केली होती. परंतु अग्निशमन विभागाने
कुठल्याही हॉटेलला ना हरकत दाखला देण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे अशा बांधकामांना परवानगी देताना अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रांची गरज असते. परंतु परवानगी नसतानाही ही हॉटेले सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी स्थानिक आदिवासी आणि
सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.