मुंबई, दि. १४ : जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या आहेत. मुंबई येथे एम सी ए क्लब येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन आणि एफ सी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल क्लब तसेच टिव्ही ९ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचा महासंकल्प: मिशन वर्ल्ड कप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, जर्मनीचे भारतातील वाणिज्य दूत किम वुथ, यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन पुढे म्हणाले, फुटबॉल हा जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे. या खेळाला चालना देण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. खेळाडूंच्या शारिरिक आणि बौद्धिक क्षमतेच्या सुदृढतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा पिढीला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन आणि एफ सी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल क्लब यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. या मधून २० विद्यार्थी निवडले गेले.
राज्यातील सर्व भागातून हे विद्यार्थी निवडले गेले आहेत आणि त्यांना प्रशिक्षण दिले गेले. नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांची ही चमु आता एप्रिल मध्ये जर्मनी येथे खेळाचे प्रशिक्षण घ्यायला जाणार आहे.
आयुक्त डॉ. दिवसे यांनी क्रीडा विभागाचे उपक्रम आणि दिशा याबद्दलची माहिती दिली. यामध्ये राज्याने मिशन लक्ष्यवेध हाती घेण्यात आले आहे. यात आलिम्पिक स्पर्धेसाठी स्पर्धक आणि प्रशिक्षक यांच्या साठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. बालेवाडी येथे स्टेट ऑफ आर्ट असे क्रीडा संकुल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जर्मनीचे भारतातील वाणिज्य दूत किम वुथ यांनी राज्याच्या पुढाकाराबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य बघुन प्रभावित झालो असल्याचे सांगुन उपस्थित विद्यार्थ्याना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
निवड झालेले विद्यार्थीः-
आदित्य गुप्ता, मोहम्मद झेनुलाबुद्दीन, निथांग वाज, आदित्य लेकामी, रायन परेरा, स्वराज सावंत, ख्वैराखपम सिंग, युग झिंजे, वेद पटेल, युवराज कदम, सर्वेश यादव, राजवीर गुरव, धृव गणोरे, शौरजीत पाटील, शिवम सिंग, सचिन सोनिस, पार्थ तलकोकुल, राधव कनोडीया, सम्राट मोरबाले , रियो पेन.
क्रीडा विभागातर्फे काही महत्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती यावेळी क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी टिव्ही ९ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. जिल्हा नियोजनाच्या निधीतून ३० टक्के रक्कम ही क्रीडा विकासासाठी वापरली जाईल, खेळाडूंना विमान प्रवास सवलत लागू केली आहे, जेवणाचा खर्च किंवा इतर आवश्यक गोष्टी तात्काळ पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अर्थसंकल्पात क्रीडा विकासासाठी भरघोस तरतूद करण्यात आली असल्याची माहिती श्री.महाजन यांनी दिली.