Friday, December 13 2024 11:14 am

यवतमाळ वाशिमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकणार – भावना गवळी यांची नाराजी दूर

राजश्री पाटील यांच्या विजयासाठी प्रचारात उतरणार

वाशिम,16 यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड राहिला असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केला. मागील २५ वर्ष या मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता शिवसेना उमेदवाराला पुन्हा विजयी करेल. आपण नाराज नसून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे भावना गवळी यांनी स्पष्ट केले.

यवतमाळ वाशिममधील खासदारांनी काम केले नाही म्हणून उमेदवारी मिळाली नाही, अशी चर्चा सुरु आहे. त्यावर पूर्णविराम देत भावना गवळी यांनी आज पत्रकार परिषदेत मतदार संघातील कामांची माहिती दिली. वर्धा-नांदेड-यवतमाळ या रेल्वेमार्गाला गती देणे, जमीन अधिग्रहणाचा विषय पीएम पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी सात वर्ष पाठपुरावा केल्याचे भावना गवळी यांनी सांगितले. आपल्या पाठपुराव्यामुळे शकुंतला रेल्वे पुन्हा सुरु करण्यासाठी राज्याने अर्धा हिस्सा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी घेतला.
वाशिम, पुसद, माहूर आणि आदिलाबादला ५० टक्के निधी उपलब्ध करुन दिला. वाशिममध्ये ११ बॅरेजस दिल्याने सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. त्याचबरोबर वाशिममध्ये तीन नवीन बॅरेजसला मान्यता मिळाली आहे. याशिवाय जिल्ह्यात डीग्री कॉलेज, केंद्रीय विद्यालय, सुपर स्पेशालिटीसाठी १५० कोटींचा निधी उपलब्ध केला, असे भावना गवळी यांनी सांगितले.

महायुतीच्या प्रचारात दिसत नसल्याने मी नाराज असल्याचे बोलले जाते, त्यावर भावना गवळी म्हणाल्या की मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. २५ वर्ष लोकांसाठी काम केले आहे. जनतेने टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. वडीलांपासून शिवसेनेसाठी काम केले आहे. संघर्ष करणारा व्यक्ती कधी नाराज होत नाही तो आत्मचिंतन करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मी नाराज नसून राजश्री पाटील यांच्या प्रचारात काम करणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४०० पारचा नारा पूर्ण करायचा आहे. तसेच राज्यासाठी अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी यापुढे पक्षाचे अधिक जोमाने काम करणार असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले. राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो. शिवसेना पक्षात विद्यार्थीदशेपासून काम करत असून यापुढे काम करत राहणार, असे भावना गवळी यांनी स्पष्ट केले.