Sunday, July 5 2020 10:18 am

यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव नाही साजरा करणार आरोग्योत्सव’

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सव साजरा करण्यावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाल्याचे समजते.

११ दिवस गणपती बाप्पाची मुर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे कोरोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समजते.

दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनला येतात. कोरोनाच्या काळात हीच गर्दी टाळण्यासाठी मंडळाने यंदा मुर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आधीच बराच ताण आहे. त्यात गणेशोत्सवामुळे होणाऱ्या गर्दीतून करोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने खबरदारी म्हणून मंडळानेच पुढाकार घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मुर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाची १४ फुट उंचीच्या मुर्तीचे लाखोभक्त आवर्जून दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. मात्र यंदा करोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं राबवण्यात येणार आहेत.