Wednesday, August 12 2020 8:40 am

यंदा चौपाटीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी करावं लागणार बुकिंग

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारे सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरता नियमावली जाहीर केल्यानंतर आता गणपती विसर्जनाच्या वेळी होणाऱ्या नागरिकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडूनही नियमावली जारी केली आहे.

गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असताना गणेश विसर्जनासाठी चौपाटीवर बुकींग करा किंवा सोसायटीच्या गेटवरुनच महापालिकेने नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडे गणेश मूर्ती विसर्जनाला पाठवा, असे महापालिकेच्या डी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

विसर्जनाच्या दिवशी चौपाटीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा उपाय मुंबई महानगरपालिकेने शोधला असून विसर्जनासाठी ऑनलाईन अॅप तयार करण्याचा विचार महापालिका करत असल्याचे सांगितले जात आहे.  दरम्यान गिरगांव चौपाटीवर मुंबईतील अनेक विभागातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशमुर्तींचे विसर्जन होत असते.

मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटीवर गर्दी होऊ नये म्हणून वेळ निश्चित करुन विसर्जन करता येणार असल्याचे आवाहन पालिकेकडून केले जाणार आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी किंवा बाप्पाला विसर्जनास नेण्यासाठी महापालिकेने नेमलेले कर्मचारी, स्वयंसेवक हे सोसायट्यांच्या गेटपर्यंत येतील.

तिथूनच मूर्ती चौपाटीवर घेऊन जातील. ज्यामुळे, रहिवाशांना गणेश विसर्जनासाठी सोसायटीबाहेरही पडण्याची गरज भासणार नाही, अशी नियमावली विसर्जनासाठी काही दिवसांत महापालिकेकडून तयार केली जाणार आहे..