मुंबई, 03- भोर तालुक्यातील मौजे कोंढरी व मौजे धानवली आणि मुळशी तालुक्यातील मौजे घुटके या तिन्ही गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्यानुसार या तिन्ही गावांचे तातडीने कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य संग्राम थोपटे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. पाटील म्हणाले की, शासनाने भूस्खलन प्रवण/ भूस्खलनग्रस्त भागाचे पुनर्वसन करण्याचे धोरण दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केले आहे. त्याप्रमाणे या गावांबाबत निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल. याशिवाय, मौजे कोंढरी व मोजे धानवली या गावातील भागांमध्ये तलाठी व ग्रामपंचायत पातळीवरील क्षेत्रीय कर्मचारी यांना दैनंदिन भेटी देऊन वस्तूस्थितीची पाहणी करून नियमित अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनुचित प्रकाराची शक्यता निर्माण झाल्यास तेथील ग्रामस्थांचे त्वरित स्थलांतरण करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून त्याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घेण्यात आली आहे. या गावांमध्ये तीन महिन्यांचे आगाऊ राशन संबंधित कुटुंबांना देण्यात आले असून पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांची बैठक घेऊन तातडीच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतच्या सूचना ग्रामस्थ व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
मौजे घुटके येथील कुटुंबीयांचे सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. तेथील कुटुंबीयांनाही तीन महिन्यांचे आगाऊ राशन देण्यात आले असून, पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला आहे. आपत्ती काळात मदत कार्यासाठी आवश्यक रेस्क्यू टिम / आपदा मित्र यांचेबरोबर नियमित संपर्क ठेऊन ही यंत्रणा देखील सतर्क ठेवण्यात आली असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.