Monday, June 1 2020 2:37 pm

मोबाईलवरील इंटरनेटच्या वापरामुळे नागरिकांचा वजन कमी करण्याकडे वाढतोय कल

मुंबई: विकसनशील देशामध्ये प्रामुख्याने आढळणारी समस्या म्हणजे वाढलेले वजन असून आशिया खंडामध्ये सध्या चीन व भारतात ३० टक्क्याहून अधिक नागरिक लठ्ठपणाचा सामना करीत आहेत. सध्या भारतात २० दशलक्ष नागरिक लठ्ठ असून ही वाढ अशीच चालू राहिल्यास २०३० साली ही संख्या ५० दशलक्ष जाण्याचा संभव आहे. लठ्ठपणा हा एक आजार असून यामुळे हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, कर्करोग व गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये लठ्ठपणा हा साधारण पस्तिशीनंतर व महिलांमध्ये मासिकपाळी बंद झाल्यावर येतो असा सर्वसाधारण समज असला तरी गेल्या दोन दशकात बदललेल्या जीवनशैलीमुळे बालवयातच लठ्ठपणाची समस्या सतावू लागली आहे परंतु मोबाईलवर इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे लठ्ठपणाविषयी आलेल्या जागरूकतेमुळे शहरातील नागरिकांचा वजन कमी करण्याकडे कल दिसून येत आहे व याचे श्रेय नक्कीच सोशल मीडियाला दिले पाहिजे. भारतीय इंटरनेट व मोबाईल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार २०१७ साली मोबाईलवर इंटरनेटचा वापर करण्यात शहरामध्ये ५१ टक्के वाढ दिसून आली असून ग्रामीण भागामध्ये १६ टक्क्याने वाढ झाली आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागल्याचे निरीक्षण मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलने नोंदविले आहे. याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे बेरिएट्रिक व मेटाबोलिक सर्जन डॉ. रमण गोयल सांगतात, ” गेल्या २ वर्षामध्ये शहरातील नागरिकांमध्ये वाढलेल्या वजनाविषयी चांगल्या प्रकारे जागरूकता आली आहे. मोबाईलवर आरोग्यविषयक असलेल्या अँपसमुळे अनेक नागरिकांना स्वतः च्या अथवा आपल्या कुटुंबीयांच्या वजनाविषयी काळजी वाटू लागली आहे. भारतामध्ये मोबाईल व इंटरनेट यामध्ये क्रांती आल्यामुळे घरबसल्या अनेक गोष्टी वाचायला व पाहायला मिळत आहे. लठ्ठपणा हा एक आजार आहे हे सांगावयास आम्हाला सांगावयास फार काळ लागला परंतु मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे जे पेशंट आमच्याकडे वजनाच्या तक्रारी घेऊन येतात त्या पेशंटना वाढत्या वजनाचे तोटे फार विस्ताराने समजावे लागत नाही. आज मोबाईलवर वजन कमी करण्यासाठी असंख्य अँपस उपलब्ध आहेत व अनेक नागरिक याचा वापरही करीत आहेत, परंतु हे सर्व करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे तितकेच महत्वाचे आहे.”

मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील जेष्ठ हृदयशल्यविशारद डॉ. पवन कुमार मोबाईलवर इंटरनेटचा वापराविषयी बोलताना सांगतात , ” हृदयविकार झालेल्या पेशंटमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते परंतु हृदयविकाराविषयी माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे आता हेच पेशंट आपल्या आरोग्याविषयी सतर्क झालेले दिसतात, परंतु वाचलेली सर्वच माहिती ही सरसकट प्रत्येक पेशंटला लागू होत नाही त्यामुळे कधीकधी पेशंट अथवा त्यांचे नातेवाईक डॉक्टरांसोबत हुज्जतही घालताना दिसतात. भारतामध्ये मोबाईलवर इंटरनेट वापरण्याचा हा सुवर्णकाळ सुरु आहे व उपलब्ध असलेली सर्वच माहिती ही वैद्यकीय विज्ञानांच्या भिंगातून तपासली गेली जात नाही पण ही माहिती वाचल्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती येत आहे ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे.”