ठाणे 05 : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांच्या सोईसाठी मोफत फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून या दवाखान्याचे उद्घाटन आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी दररोज सकाळी 8.30 ते 4.30 या वेळेत हा मोफत दवाखाना उपलब्ध असणार आहे. या फिरत्या दवाखान्यामध्ये डॉक्टर्स, नर्स रक्ताच्या प्राथमिक चाचणया, औषधे असणार आहेत. या दवाखान्याला स्क्रीन लावण्यात आली असून या स्क्रीनच्या माध्यमातून आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी आदींबाबतच्या सूचना दिल्या जाणार आहे. या फिरत्या दवाखान्यामुळे रुग्णांना प्राथमिक उपचार उपलब्ध होणार आहेत. आजपासून हा फिरता दवाखाना शहरातील झोपडपट्टी परिसरात फिरणार असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. पॅनॉसॉनिक इंडिया आणि गुरूकृपा फाऊंडेशन यांचे देखील सहकार्य या फिरत्या दवाखान्यास लाभले आहे.