Sunday, September 15 2019 11:04 am

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स

त्या ब्लॅक बॉक्सची चौकशी झालीच पाहिजे – काँग्रेस

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकाचा प्रचार सुरू असताना आरोप प्रत्यारोपांनाही भरती आली आहे. सध्या प्रचारसभा घेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून एक काळा बॉक्स नेण्यात आल्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, तसेच निवडणूक आयोगाने या काळ्या बॉक्समध्ये काय होते, याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी आनंद शर्मा यांनी केली आहे. शर्मा म्हणाले की,”कर्नाटक प्रदेश काँग्रेसने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरसोबत तीन हेलिकॉप्टर उडत असल्याचे आम्ही पाहिले आहे. हे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर  त्यातून आणलेला एक काळा बॉक्स खासगी कारमधून नेण्यात आला. ही कार एसपीजी ताफ्याचा भाग नव्हती.” तसेच मोदींनी पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा हिशोब जनतेला द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.  

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसने या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती दिली. त्यांनी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात,”काल चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक गुढ बॉक्स बाहेर काढण्यात आला. आयोगाने याची दखल घेऊन या बॉक्समध्ये काय होते आणि इनोव्हा कुणाची होती. याची चौकशी केली पाहिजे.” अशी मागणी जोर धरत आहे.