Monday, June 1 2020 1:16 pm

मेट्रो प्रस्तावित नसलेल्या भागांत जलद वाहतूक व्यवस्था; पुढील महिन्यात मंजुरीसाठी पालिका प्रयत्नशील

ठाणे : मेट्रोपासून वंचित राहणाऱ्या कळवा, मुंब्रा या परिसरांसाठी ठाणे महापालिकेने आखलेली वैयक्तिक जलद वाहतूक व्यवस्था (पीआरटीएस) आता कोपरी आणि घोडबंदरच्या काही भागांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. पूर्वी आखण्यात आलेली ३४ किलोमीटरची मार्गिका नव्या आराखडय़ानुसार १०३ किलोमीटपर्यंत वाढवली जाणार आहे.

कमी वेळेत होणार जलद प्रवास

सहा प्रवासी बसण्याची क्षमता

ठाणे तसेच घोडबंदर भागातील वाहतुकीसाठी अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पाच्या अहवालास नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. मात्र, हा प्रकल्प कळवा आणि मुंब्रा भागांत राबविला जाणार नसल्यामुळे या ठिकाणी पीआरटीएस प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. त्याचा अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूकही केली आहे. या सल्लागारांकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

हा प्रकल्प नेमका कसा असेल आणि त्यासाठी किती खर्च येऊ शकले, हे अहवालात नमूद केले जाणार आहे. मात्र, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा प्रकल्प विविध मंजुऱ्यांसाठी रखडण्याची चिंता महापालिका प्रशासनाला आहे. फेब्रुवारीतील सर्वसाधारण सभेपुढे पीआरटीएस प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आाणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले.

पीआरटीएसमुळे चार ते सहा प्रवासी क्षमता असलेल्या स्वयंचलित पॉड कारमधून ठाणेकरांना ताशी ४० किमीच्या वेगाने विनाथांबा प्रवास करणे शक्य होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. या प्रकल्पासाठी आर्थिक आणि अन्य मान्यता मिळवण्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या मंजुऱ्या मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रकल्पाचे स्वरूप

कोपरी, कळवा, मुंब्रा आणि अन्य भागांमध्ये एकूण पाच टप्प्यांत पीआरटीएस प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १०३ किमी लांबीची मार्गिका तयार करण्यात येणार आहे. त्यापैकी कळवा आणि मुंब्रा या दोन्ही शहरांमध्ये ३४ किमी लांब मार्गिका आणि ६० स्थानके असणार आहेत. चार ते सहा प्रवासी क्षमता असलेल्या स्वयंचलित पॉड कारमधून ठाणेकरांना ताशी ४० किमीच्या वेगाने विनाथांबा प्रवास करणे शक्य होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.