रत्नागिरी,12:- रत्नागिरी शहरातील रा.भा.शिर्के प्रशाला, माळनाका येथे आज भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पत्रकार परिषद संपली आणि त्याचवेळी एका कार्यकर्त्याने पालकमंत्री महोदयांना सांगितले की, या रोजगार महामेळाव्यानिमित्त काही मूकबधीर युवक या ठिकाणी आले आहेत, मात्र ते मूकबधीर असल्याने त्यांना कोणते काम द्यायचे,कोणती नोकरी द्यायची हा यक्ष प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. पालकमंत्र्यांनी अतिशय संवेदनशीलतेने या मूकबधीर युवकांसाठी तात्काळ तिथल्या तिथेच बैठक आयोजित केली. त्या सर्व युवकांची व त्यांच्यासह आलेल्या त्यांच्या पालकांची पालकमंत्री श्री सामंत यांनी आस्थेने विचारपूस करून संवाद साधला. या युवकांना कशा प्रकारे नोकरी देता येईल, त्यांच्या कायमस्वरूपी उपजीविकेसाठी काय करता येईल, यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी एम डी देवेंदर सिंह, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त इनुजा शेख, औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, राहुल पंडित तसेच युवा हब चे संचालक किरण रहाणे यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. मात्र मूकबधीर युवकांकडे कौशल्य,बुद्धी असूनही त्यांना योग्य संधी मिळत नाही. त्यामुळे आता या युवकांना योग्य ती संधी मिळण्यासाठी नेमके काय करता येईल, यासाठी येत्या काही दिवसातच स्वतंत्र बैठक घेऊन पुढील एक महिन्याच्या कालावधीत या युवकांच्या उपजीविकेसाठी कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असा निर्णय पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी तातडीने घेतला.
पालकमंत्र्यांनी दाखवलेल्या या संवेदनशील कृतीबद्दल सर्व मूकबधीर युवक व त्यांच्या पालकांनी पालकमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानले.