Tuesday, June 2 2020 5:14 am

मुलुंडनाक्यावर आता होणार एमएच 04 गाड्या टोलफ्री , संजय केळकर यांच्या प्रयत्नांना यश

ठाणे : ठाण्यातील वाहनांना मुंबईत प्रवेश करताना भरावा लागणारा टोल रद्द व्हावा यासाठी भाजपा नगरसेवकाने केलेले आंदोलन तसेच स्थानिक भाजपा आमदार संजय केळकर यांनी महसूल मंत्र्यांकढे केलेली शिष्टाई कामी आली असून लवकरच एमएच 04 क्रमांकाची वाहने मुंबईकडे जाताना टोलमधून सुटण्याची चिन्हे आहेत.

ठाण्यातील वाहनांना मुंबईत प्रवेश करताना मुलुंड टोलनाक्यावर टोल भरावा लागत आहे. या टोलपासून सुटका व्हावी, पर्यायाने येथील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी ठाणेकरांनी मागणी लावून धरली आहे. ठाणे पूर्वेतील भाजपा नगरसेवक भरत चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी टोलमुक्तीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.

या टोलमुक्तीसाठी भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या  नेतृत्वाखाली नगरसेवक भरत चव्हाण आणि  शिष्टमंडळाने राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. या भेटीत श्री.पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अन्य टोलनाक्यांबाबत घेतलेल्या निर्णयानुसार मुलुंड टोलनाक्यावरही एमएच 04 क्रमांकाच्या वाहनांना  टोल आकारण्यात येणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी आ.संजय केळकर यांना दिले.

नगरसेवक भरत चव्हाण यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. ‘टोलमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाला ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.आ.संजय केळकर यांचा पुढाकार महसूलमंत्र्यांनी त्वरीत दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे. याबाबत आम्ही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन दिले होते. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,’असेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.