ठाणे, 21 :- शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत “अभय योजना 2023” लागू केली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी ते 31 मार्च, अशा दोन टप्यात लागू केलेली आहे.
या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्याबाबतीत शासनास देय होणाऱ्या तथा वसुलीपात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सूट तथा सवलत लागू करण्यात आली आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे (शहर) नारायण राजपूत व मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे (ग्रामीण) ओमप्रकाश जांभळे यांनी दिली आहे.
अशी असेल सूट व सवलत-
अनुसूची 1 प्रमाणे –
1 जानेवारी,1980 ते 31 डिसेंबर,2000 या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंतच्या या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपूर्ण माफी. तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात ५० टक्के व दंडाची संपूर्ण माफी.
1 जानेवारी,1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 80 टक्के व दंडाच्या रक्कमेत 80 टक्के माफी. तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात 40 टक्के व दंडाच्या रक्कमेत 70 टक्के माफी.
अनुसूची 2 प्रमाणे –
1 जानेवारी, 2001 ते 31 डिसेंबर, 2020 या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंतच्या या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटी रुपयांपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 25 टक्के माफी व दंडाच्या रक्कमेत 90 टक्के माफी असेल.
(अ) जर प्रदान करावयाच्या किंवा प्रदेय असलेल्या संपूर्ण मुद्रांक शुल्कावर आकारण्यात यावयाची शास्ती, रुपये 25 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर, प्रदान करावयाच्या किंवा प्रदेय असलेल्या संपूर्ण मुद्रांक शुल्कावर आकारण्यात यावयाच्या शास्तीवर द्यावयाची शास्तीतील कपात 90 टक्के इतकी असेल.)
(ब) जर प्रदान करावयाच्या किंवा प्रदेय असलेल्या संपूर्ण मुद्रांक शुल्कावर आकारण्यात यावयाची शास्ती, 25 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर, शास्ती म्हणून स्वीकारण्याची रक्कम, केवळ रुपये 25 लाख रुपयांपैक्षा इतकी असेल आणि उर्वरित किंवा शिल्लक शास्ती माफ करण्यात येईल.
1 जानेवारी, 2001 ते 31 डिसेंबर, 2020 या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंतच्या या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात 20 टक्के माफी व शास्ती म्हणून स्वीकारण्याची रक्कम, रुपये 1 कोटी इतकी असेल आणि उर्वरित किंवा शिल्लक शास्ती माफ करण्यात येईल.
1 जानेवारी, 2001 ते 31 डिसेंबर, 2020 या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटी रुपयांपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 20 टक्के माफी व दंडाच्या रक्कमेत 80 टक्के माफी.
(अ) जर प्रदान करावयाच्या किंवा प्रदेय असलेल्या संपूर्ण मुद्रांक शुल्कावर आकारण्यात यावयाची शास्ती, 50 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर, प्रदान करावयाच्या किंवा प्रदेय असलेल्या संपूर्ण मुद्रांक शुल्कावर आकारण्यात यावयाच्या शास्तीवर द्यावयाची शास्तीतील कपात 80 टक्के इतकी असेल.
(ब) जर प्रदान करावयाच्या किंवा प्रदेय असलेल्या संपूर्ण मुद्रांक शुल्कावर आकारण्यात यावयाची शास्ती, 50 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर, शास्ती म्हणून स्वीकारण्याची रक्कम केवळ रुपये 50 लाख इतकी असेल आणि उर्वरित किंवा शिल्लक शास्ती माफ करण्यात येईल.
१ जानेवारी, 2001 ते 31 डिसेंबर, 2020 या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात 10 टक्के माफी व शास्ती म्हणून स्वीकारण्याची रक्कम, रुपये 2 कोटी इतकी असेल आणि उर्वरित किंवा शिल्लक शास्ती माफ करण्यात येईल.
शासनामार्फत सुरु असलेल्या “अभय योजना 2023” अंतर्गत दंड सवलत योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच या मुद्रांक कार्यालयामार्फत ज्यांना मुद्रांक शुल्क भरण्याबाबत नोटीस प्राप्त झालेली आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता शहरी भागातील नागरिकांनी आपला अर्ज सह जिल्हा निबंधक वर्ग १ मुद्रांक तथा जिल्हाधिकारी ठाणे (श्हर), जिल्हाधिकारी कार्यालय, चौथा मजला, ठाणे (पश्चिम), पिन कोड-400 601 तर ग्रामीण भागातील नागरिकांनी सह जिल्हा निबंधक वर्ग १ मुद्रांक तथा जिल्हाधिकारी ठाणे (ग्रामीण), जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, ठाणे (पश्चिम), पिन कोड-400 601 या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे (शहर) नारायण राजपूत व मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे (ग्रामीण) ओमप्रकाश जांभळे यांनी केले आहे.