ठाणे,१ – ठाण्यात काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने एका मेळाव्याचे आयोजन केले होते. आयोजित केलेल्या या मेळाव्यात ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. तर याच मेळाव्यात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्धल आक्षपार्ह विधान करण्यात आले होते. या विधानाची गंभीर दखल घेत ठाण्याचे माजी नगरसेवक तथा शिंदे यांचे कट्टर समर्थक विकास रेपाळें यांनी पोलिसात तक्रार केली होती. अखेर नौपाडा पोलिसांनी श्रीमती राजुल पटेल यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणे आणि आक्षपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाची शिवगर्जना यात्रा ( दि.२६ फेब्रुवारी ) सर्वत्र राज्यभर राबविण्यात आली होती. याच अनुषंगाने ठाण्यात राम गणेश गडकरी रंगायतन येथे देखील मेळावा आयोजित केला होता. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर मुंबईच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी आक्षपार्ह टीका केली होती. पटेल यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रतील तमाम शिवसनिकांच्या व नागरिकांच्या भावना दुखावल्या असून संपूर्ण महाराष्ट्रभर असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याची भावना रेपाळें यांनी व्यक्त केली आहे.
मुळात राजुल पटेल यांनी २०१९ च्या निवडणूकीत शिवसेनेचं तिकीट मिळाले नव्हते, त्यावेळी त्यांनी पक्षविरोधात गद्दारी करून निवडणुक लढवली होती. मात्र त्याचा पराभव झाला होता. त्यामुळें अश्या लोकांनी ठाण्यात येऊन शिवसेनेवर आणि कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांवर टीका करणे शोभत नाही. दरम्यान मेळाव्याला आमंत्रित करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा खोचक टीका माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी केली आहे.