Monday, May 12 2025 4:43 pm

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा ‘हुकमी एक्का’ लोकसभेच्या रिंगणात

ठाणे, 01: महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाण्यात असताना नरेश म्हस्के हे नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या शेजारी दिसतात. तसंच कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच घोषणा केली होती.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात अखेर शिंदे सेने कडून माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा 1 मे च्या दिवशी करण्यात आली आहे. शिंदे सेनेही ठाणे लोकसभा आपल्या ताब्यात ठेवली आहे. त्यामुळे आता उद्धवसेना विरुद्ध शिंदे सेना असा सामना ठाणे लोकसभेत पहावयास मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून ठाणे लोकसभा कोणाकडे जाणार यावरून शिंदे सेना आणि भाजप मध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर ही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदे सेनेला यश आल्याचे दिसत आहे. त्यात शिंदे सेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, माजी महापौर संजय मोरे, मीनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर विश्वास दाखवला आणि आज त्यांच्या नावाची घोषणा केली.
दोन वेळा स्विकृत सदस्य म्हणून ते पालिकेत दाखल. त्यानंतर 2012 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना मिळाले. परंतु 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. अखेर पक्षाला त्यांची दखल घ्यावीच लागली. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि सर्व पक्षीयांशी असलेल्या सखोलाच्या नात्यामुळेच अखेर पक्षाला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली आणि भाजपाला दिलेले कमिटमेंट मोडत त्यांना स्थायी समितीचे सभापतीपदही बहाल करावे लागले होते. त्यानंतर आता 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत सभागृह नेते पद त्यांना दिले.
त्यानंतर त्यांनी महापौर पदाची धुराही ही सांभाळली. शिंदे यांचे विश्वासु समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद ही आहे.