Friday, December 13 2024 12:15 pm

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाचा शुभारंभ

ठाणे : ठाणे शहराचा विकास हा झपाट्याने होत असून या शहरातील बदल हे नागरिकांना दिसायला सुरूवात झाली आहे. ठाणे बदलत आहे, ठाण्यात विविध सेवासुविधा प्राप्त होत आहेत, ठाण्याच्या विकासामध्ये महापालिकेबरोबरच नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा असून ठाण्याचा विकास हा वेगवान पध्दतीने होणार असून येत्या सहा महिन्यात ठाणे शहर हे खड्डेमुक्त, कचरामुक्त, स्वच्छ आणि सौंदर्यीकरणाने नटलेले दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी व्यक्त केला. यावेळी अभियानाची ध्वनीचित्रफितही मुख्यमंत्र्याच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आली.

ठाणे महापालिकेच्या कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाचा शुभारंभ आज (03 डिसेंबर) आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय वाघुले, मिलिंद पाटणकर, नारायण पवार, मनोहर डुंबरे, महापालिकेचे इतर अधिकारी/ कर्मचारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा ग्रंथबुके देवून महापालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

*असे असेल मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे अभियान*

स्वच्छ व सुंदर ठाणे, खड्डेमुक्त ठाणे व स्वच्छ शौचालय यांचा समावेश या अभियानात आहे. स्वच्छ व सुंदर ठाणे अंतर्गत शहरातील सर्व रस्ते, सार्वजनिक जागा, पर्यटन स्थळे कायमस्वरुपी स्वच्छ ठेवणे, नेहमी कचरा पडणाऱ्या शहरातील सर्व जागा कचरामुक्त करुन त्या सर्व ठिकाणी सौंदर्यीकरण करणे, डेब्रिजमुक्त ठाणे शहर, शहरातील रस्ते, उड्डाणपूल यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणे, शहराच्या स्वच्छतेत महत्वाचे योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणे व सफाई कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांची महापालिका रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी करणे असे सहा महिन्याचे अभियान राबविण्यात येणार असून स्वच्छ व आरोग्यदायी ठाणे शहर निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

ठाणे शहर सौंदर्यीकरणाअंतर्गत शहरातील प्रवेशद्वार (एन्ट्री गेटस्), शिल्पाकृतीसह चौक सुशोभिकरण, रस्ते सुशोभिकरण, भित्तीचित्रे, डिव्हायडर व कर्ब स्टोनची रंगरंगोटी, थर्मोप्लस्टिक पेंटद्वारे लेन मार्किंग व झेब्रा क्रॉसिंग, उड्डाणपुल, पादचारी पूल, खाडीवरील पूल, शासकीय इमारतींची रंगरंगोटी व विद्युत रोषणाई, मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करुन वृक्ष लागवड करुन स्वच्छतेसोबत सौंदर्यात भर पडणार आहे

*खड्डे मुक्त ठाणे शहर*

हे अभियान देखील सहा महिने कालावधीत राबविण्यात येणार असून 10.70 कि.मी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, 55.68 कि.मी रस्त्याचे यू.टी.डब्ल्यू.टी पध्दतीने काम करणे व 75.44 कि.मी रस्त्यांचे डांबरीकरण पध्दतीने पुर्नपृष्ठीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.

*स्वच्छ शौचालय अभियान*

सहा महिने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ शौचालय अभियानामध्ये शहरातील सर्व शौचालये 24 तास स्वच्छ ठेवणे, आवश्यक त्या सर्व शौचालयात केअरटेकर उपलब्ध करणे, शौचालयात सर्व मुलभूत सोयीसुविधांसह साधनसामुग्री उपलब्ध करणे. महापालिका मुख्यालयातील सर्व शौचालयातील आमूलाग्र बदल करणे आदी कामे प्रामुख्याने करण्यात येणार आहे.

यावेळी अभियानाबद्दल माहिती देताना ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तसेच एमएमआरडीए व इतर संस्थांच्यावतीने अनेक प्रकल्प सुरू आहेत. ठाणे शहरात ज्या समस्या आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू असून त्याची फलश्रुती दिसायला सुरूवात झाली आहे. नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेल्या समस्या कालबद्ध पध्दतीने कशा सोडवता येतील यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ शहर व सौंदर्यीकरण यावर भर देण्यात येत आहे. स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्यासाठी महापालिकेसोबत नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहेच पण शहराबद्दल प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. खड्डे मुक्त शहर, शौचालयांची सुविधा याकडेही भर दिला जात असून या अभियानासाठी मा. मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करुन दिलेला असून त्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. मा. मुख्यमंत्री यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी समर्पित भावनेने काम केले तर येत्या सहा महिन्यात ठाण्याचे चित्र पालटलेले नक्कीच दिसेल असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.