Wednesday, August 12 2020 8:57 am

मुख्यमंत्री मातोश्री च्या पिंजऱ्यात बंद – नारायण राणे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत त्यामुळे ते मातोश्री च्या बाहेर पडत नाही अशी जळजळीत टीका भाजप नेते नारायण राणे यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे .तसेच सरकारमध्ये चार मुख्यमंत्री आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होणार नाही असे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर ताशेरे ओढले.पत्रकार परिषेदपूर्वी खा. राणे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार नितेश राणे आणि माजी आमदार राज पुरोहीत उपस्थित होते.

गेल्या अनेक महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीतून बाहेर पाऊल टाकलेले नाही. ते बाहेर पडले तरी फार काही बोलत नाहीत. अनेक महिने मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाचे तोंडही पाहिलेले नाही. त्यामुळे सरकारी अधिकारी आदेश पाळत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असा मुख्यमंत्री सापडणार नाही आणि कोणी ठेवणारही नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले.

राज्यातील उद्योगधंदे कोलमडून पडले तरी मुख्यमंत्री डोळे मिटून आहेत. लोकांना पगार मिळत नाहीत. तरी मुख्यमंत्री फक्त लॉकडाऊन करतायत. ते निष्क्रिय असल्यामुळे प्रशासन चालवू शकत नाहीत. त्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच मागणी केली होती. या मागणीवर मी आजही ठाम असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

आज मुंबईसारखं जागतिक दर्जाचं शहर भकास होत चाललं आहे. याला जबाबदार शिवसेना आहे. मुंबई महानगरपालिकेत जितका भ्रष्टाचार आहे, तसा अन्य कुठल्याही संस्थेत नाही. राज्याला या चार महिन्यात १० वर्ष मागे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या काळात कोरोना योद्धे ,कंत्राटी कामगार डॉक्टर, परिचारिका यांचे पगार दिले नसून बेस्ट कर्मचाऱ्यांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.दिवाळखोरीत गेलेली बेस्ट खासगीकरणाच्या दिशेने जात असल्याचीही टीका राणे यांनी केली.