Monday, April 21 2025 10:10 am
latest

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

मराठी मातीतला ‘रानकवी’ हरपला

मुंबई, ३ :- मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

‘मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेतातून, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.