Thursday, December 12 2024 7:21 pm

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अनेक विकासाकामांना गती मिळाली – आमदार प्रताप सरनाईक

शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी १५ वर्षात केलेल्या विकासकामांचा वचननामा प्रसिद्ध केला…

ठाणे, १४ : शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी १५ वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला. यावेळी १५ वर्षात केलेल्या विविध विकासकामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

घोडबंदर व लोकमान्य नगरमधील पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे ५० एमएलडी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती. ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली. मुंबई महानगरपालिकेकडून ५० एमएलडी पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी २५ एमएलडी पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे. मिरा – भाईंदर शहारला सूर्या प्रकल्पातून २१८ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मी दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचे मला अत्यंत समाधान आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

कापूरबावडी ते गायमुख ६० मीटर आणि गायमुख ते फाऊंटन ३० मीटर रस्त्याचे ६० मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून त्या कामास सुरुवात झाली आहे. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

हॉगकाँग, मलेशिया व सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ १२० एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. पाळीव प्राण्यांसाठी अद्यावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले आहे. विहिरींचे संवर्धन, म्युझिकल फाऊंटन, उपवन तलावाचे सुशोभिकरण, कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकामकामं मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली. याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे प्रताप सरनाईक यांनी आभार व्यक्त केले. भविष्यात रोप वे, जलवाहतूक, आणखी कॅशलेस रुग्णालय आदी विविध प्रकल्प साकारण्यात येणार आहेत असे प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.