Saturday, June 14 2025 3:54 pm

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अभिनेता अतुल परचुरे यांना श्रद्धांजली

मुंबई, 15:- हरहुन्नरी, अभिनय संपन्न अभिनेते अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या निधनामुळे एका गुणी कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बालरंगभूमी पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या सहज, टवटवीत अभिनयाने छाप उमटवली. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीतील नाटक, मालिका चित्रपट आणि जाहिरात या क्षेत्रांत त्यांनी ओळख निर्माण केली. शाब्दिक, वाचिक विनोद यांमध्ये त्यांनी अंगभूत गुणांनी रंग भरले. त्यांच्या निधनामुळे एक गुणी, अभिनय संपन्न कलाकाराला आपण मुकलो आहोत. ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे. परचुरे यांच्या असंख्य चाहत्यांपैकी एक म्हणून मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वराने त्यांना हे दु:ख सहन करण्याचं बळ द्यावी, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.