Monday, March 17 2025 11:26 pm

मुंब्रा व दिवा परिसराची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केली पाहणी

साफसफाई व अपूर्ण असलेली रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश

ठाणे 09 : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज मुंब्रा व दिवा परिसरातील पाहणी केली. मुंब्र्यातील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेवून शहरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. शहरातील साफसफाई व स्वच्छता करण्याबरोबरच अपूर्ण असलेली रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी,उपायुक्त जी.जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, माजी नगरसेवक राजन किणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंब्रा परिसरातील रेतीबंदर, राणानगर तसेच मुंब्रा रेल्वेस्थानक येथील नाल्यांची पाहणी केली. डोंगरावरुन येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर नाल्यात वाहून येणाऱ्या कचऱ्यांसाठी बसविण्यात आलेल्या जाळ्याची पाहणी करुन नाल्याच्या साफसफाईबाबत आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अतिवृष्टीच्या काळात सतर्क राहण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच रेतीबंदर, बॉम्बे कॉलनी, सम्राटनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, रईसबाग, अमृतनगर, दिवा येथील रशीद कंपाऊंड, कादर पॅलेस, चाँदनगर नाला, किस्मत कॉलनी आदी ठिकाणची पाहणी केली. तसेच शहरातील विविध ठिकाणी साफसफाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रेतीबंदर- दत्तवाडी या नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याची पाहणी करुन सदरचा रस्ता वाहतुकीसाठी आजपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

महापालिकेच्या कौसा रुग्णालयाची पाहणी देखील आयुक्तांनी केली. या ठिकाणी सुरू असलेल्या ओपीडीची माहिती घेतली तसेच या परिसरातील रुग्णांसाठी सदर रुग्णालयात डायलेसीस सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले.

फोटो ओळ : मुंब्रा व दिवा परिसरातील विविध कामांची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी,उपायुक्त जी.जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, माजी नगरसेवक राजन किणे आदी.

कौसा येथील महापालिकेच्या रुग्णालयाची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी आदी.