ठाणे,14 – मुंब्रा खाडी, कोपर खाडी व भिवंडी लगतच्या खाडीमध्ये गस्तीवर असलेल्या ठाणे व भिवंडी तहसील कार्यालयाच्या पथकाने आज अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या 2 सक्शन पंप आणि 2 बार्जवर धडक कारवाई करुन या सक्शन पंप व बार्ज यांच्या इंजिनमध्ये साखर टाकून नष्ट करून पाण्यामध्ये बुडविले. तसेच खाडी लगत असलेल्या रेती साठ्यासह 3 कुंड्या नष्ट करण्याची कारवाई केली. या कारवाईमध्ये अंदाजे 50 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
माहे जानेवारी व फेब्रुवारीमध्ये अनधिकृत रेती उत्खननावर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत धडक कारवाई करण्यात येत असून मागील तीन आठवड्यामध्ये आठ कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये 9 बार्ज, 7 सक्शन पंप, 20 ब्रास रेतीसाठा, 9 रेतीच्या कुंड्या / हौद नष्ट करण्यात आले. सदर साहित्याची एकूण किंमत 1.72 कोटी रुपये आहे. आजही मुंब्रा, कोपर व भिवंडी खाडीलगत कारवाई करून अवैध रेती उत्खनन करणाऱ्या सक्शन पंप व बार्जवर कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 01 एप्रिल 2022 ते 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत जिल्ह्यांतर्गत अनधिकृत गौण खनिज वाहनांच्या तपासणी मोहिमेदरम्यान 11,307 वाहनांची तपासणी केली असून आजपर्यंत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 205 वाहनांवर दंडनीय कारवाई केली आहे. अनधिकृत गौण खनिज वाहन करणाऱ्या ट्रक मालकांकडून रू. 301.61 कोटी एवढा महसूल वसूल करण्यात आलेला आहे.
अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहन याच्यावर देखरेख ठेवण्याकरिता अद्ययावत “महाखनिज प्रणालीचा” वापर करण्यात येत असून त्याद्वारे छाननी करून अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.