Tuesday, January 21 2025 4:29 am
latest

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची कोपरी येथील कै दत्ताजी साळवी निसर्ग शैक्षणिक केंद्राला भेट

ठाणे, 10 : मुंबई विद्यापीठाच्या बीबीए – एलएलबी (एच) च्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज पर्यावरण कायदा या अभ्यासक्रमाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाणे कोपरी येथील कै.दत्ताजी साळवी निसर्ग शैक्षणिक केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांना ठाणे महापालिकेच्यावतीने या उद्यानाची देखभाल करणारे निसर्गप्रेमी विजय पाटील यांनी वनस्पतींबाबत मार्गदर्शन केले.

दत्ताजी साळवी उद्यानात विद्यार्थ्यांना पर्यावरणीय प्रणाली आणि विविध औषणी, सुगंधी, देशी तसेच विदेशी, जलचर, वाळवंटी वनस्पती तसेच सुगंधी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या गुणधर्माची त्यांनी माहिती घेतली. हे उद्यान सध्या निसर्गसंवर्धन आणि पर्यावरण शिक्षणाशी संबंधित अनेक उपक्रमांमध्ये सहभागी आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी बोन्साय, विदेशी आणि देशी वनस्पतींच्या प्रजातींचे प्रदर्शन करणाऱ्या ग्लास हाऊसला देखील विद्यार्थ्यांनी भेट दिली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे निसर्गप्रेमी विजय साळवी यांनी विद्यार्थ्यांना परफ्युम उद्योगात वापरल्या जाणाऱ्या युकॅलिप्टस, सिट्रीओडोरा, बिक्सा ओरेलाना (शेंद्री), कॅसिया फिस्टुला (बहवा), व्हॅटेरिया इंडिका (उद), मोलोटस फिलीपेन्सिस (कुंकू) आदी वनस्पतींच्या प्रजातींचा माहिती दिली. तसेच रुद्राक्ष, धूप, दालचिनी, तमालपत्र, रक्तचंदन, हिरडा, चंदन, केवडा, मुचकुंद, सर्व मसाले, गुलमोहर, सुरंगी, पळस, पांगरा, शिवण, शिसम, बारतोंडी, रिठा, रतनगुंज, मोह, टेटू, उंडी आदी वनस्पतींची देखील माहिती या विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. या उद्यानात वनस्पतींच्या 600 हून अधिक प्रजाती असल्याचेही श्री. साळवी यांनी यावेळी सांगितले.

या उद्यानातील नेचर एज्युकेशन सेंटरला दिलेल्या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना सर्वंकष अशी माहिती मिळाली असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील यांचे आभार व्यक्त केले.