Tuesday, July 23 2019 2:51 am

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात पाच जणांचा मृत्यू

खोपोली : मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता च्या सुमारास आडोशी वळणावर किमी 41 जवळ हा अपघात झाला.

मुंबईच्या दिशेने सिमेंट बॅगा घेऊन जाणारा ट्रक हा आडोशी बोगदा पार करुन जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मुंबई लेनवरुन पुणा लेनवर पलटी झाला. यावेळी पुण्याच्या दिशेने जाणार्‍या तीन कार या ट्रकखाली चिरडल्याने त्यामधील चार जणांचा जागीच तर एक जणाचा उपचाराकरिता घेऊन जात असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून लांबच लांब वाहनांचा रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच खोपोली व बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते, आयआरबी व डेल्टा फोर्सचे कर्मचारी व देवदूत पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत मृत व जखमींना वाहनांमधून बाहेर काढत उपचाराकरिता रवाना केले.जखमींना MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.