*उद्या शनिवारी गोरेगाव येथे आयोजन*
मुंबई, ३: मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने मुंबई उपनगरांमध्ये फेब्रुवारी महिन्यात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्यांचे उद्घाटन होणार असून नोकरीइच्छूक उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. उद्या शनिवारी 4 फेब्रवारी रोजी शहीद स्मृती क्रिंडागण (व्हिनर्स जॉगर्स पार्क), पाटकर कॉलेजजवळ, उन्नत नगर, एस. व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम) येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उपस्थित राहून नोकरीइच्छूक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.
10 वी, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय. पदवीधर, पदवीकाधारक अशा विविध नोकरीइच्छूक उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध नामांकीत कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.
11 फेब्रुवारी रोजी सेंट फ्रान्सीस आयटीआय माउंट पोनसुर, एस.व्ही.रोड, हिरालाल भगवती हॉस्पीटलजवळ, बोरीवली (पश्चिम) येथे तर 18 फेब्रुवारी रोजी ऑक्सफर्ड हायस्कुल, टँक रोड, भांडूप (पश्चिम) येथे हे मेळावे होणार आहेत. या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र.वा. खंडारे यांनी केले आहे.