विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
मुंबई, 03 : विद्यादान सहायक मंडळाच्या (व्हीएसएम) दृष्यकला विभागामार्फत `भवताल’ प्रकल्पात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे मुंबईत शुक्रवारपासून 5 जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत प्रदर्शन भरविण्यात येत आहे. ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार पद्यश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या प्रदर्शनातील कलाकृती वाजवी किंमतीत उपलब्ध करण्यात आल्या असून, कलाकृती खरेदी करून कला रसिकांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता येईल.
मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्याजवळच्या मणी भवन मागील गांधी फिल्म फाऊंडेशनमध्ये शुक्रवारपासून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत तीन दिवस प्रदर्शन भरविण्यात येत आहे. विद्यादान सहायक मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साह्य केले जाते. मंडळाच्या दृश्यकला विभागात राज्यातील ५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधून संवेदनशील व सामाजिक बांधिलकी जपणारा भविष्यातील नागरिक घडविण्याचा मंडळाकडून प्रयत्न केला जात आहे.
यंदा विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे .गांधी फिल्म फाऊंडेशनमध्ये होणाऱ्या प्रदर्शनात अनेक आकर्षक कलाकृती मांडण्यात येणार आहेत. प्रत्येकाची जडणघडण आपल्या सभोवतालच्या वातावरणातून होते. माणूस म्हणून घडत जाणे, या सभोवतालाशी संबंधित असते. कलाकारांचाही त्याला अपवाद नसून, सभोवतालच्या खूणा त्यांच्याकडून संवेदनशीलतेने मांडल्या जातात. ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी कलाकृती तयार केल्या आहेत. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.