Tuesday, July 7 2020 1:39 am

मुंबईत पुन्हा पावसाचे आगमन

मुंबई :-  दिवाळी मध्ये विश्रांती घेऊन आज पुन्हा मुंबईसह उपनगरात  पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपार नंतर मुंबईत ढगाचे वातावरण निर्माण झाले आणि लगेच  पावसाला सुरुवात झाली. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवलेली होती. ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यात तर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा परतीचा पाऊस विलंबाने गेला. मात्र त्यानंतरही पाऊस राज्यात विविध ठिकाणी अधूनमधून हजेरी लावतच आहे. राज्यात नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकणात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी ऐन दिवाळीतही पावसाने थांबायचे नाव घेतले नाही. तत्पूर्वी काही दिवस म्हणजे २१ ऑक्टोबरला पावसाने रात्री अचानक जोरदार बरसून मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. त्यानंतर दिवाळीदरम्यान अरबी समुद्रातील ‘क्यार’ चक्रीवादळाने थैमान घातले आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवरही मुंबईत पावसाने हजेरी लावली होती.मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत केवळ आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चारही दिवस कोरडे जाणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गात मात्र पुढीत ३ ते ४ दिवस पावसाचे असल्याची शक्याता हवामान विभागाने वर्तवली आहे.