Saturday, September 18 2021 12:44 pm
ताजी बातमी

मुंबईत जमावबंदीचे आदेश; १४४ कलम लागू

मुंबईत: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सवादरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबईत १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लावण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणार नाहीत असे आदेश लागू केले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तांकडून यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच रुग्णसंख्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कशी टाळता येईल, यावर चर्चा करण्यात आली होती.

सार्वजनिक मंडळांना आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्तीच्या प्रत्यक्षदर्शन व मुखदर्शनास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी ऑनलाइन, केबल नेटवर्क, फे सबुक, समाजमाध्यमे यांद्वारे दर्शनाची व्यवस्था करावी, असाही नियम घालण्यात आला आहे.