Wednesday, February 26 2020 10:15 am

मुंबईचे डबेवाल्यांना हक्काची घरे मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महाराष्ट्र विकासआघाडी सरकारने मुंबईचे डबेवाले यांना चांगली बातमी दिली आहे. मुंबईतील डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध देण्याची तातडीने कार्यवाही करावी, तसे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी पवार यांनी दिलेत.मुंबई डबेवाले यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या भवनाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिलेत. यावेळी मुंबईतील डबेवाल्यांकरिता घरबांधणी, मुंबई डबेवाला भवन तसेच अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कामगार विकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलींद म्हैसकर, यावेळी मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी किरण गवांदे, रामदास करवंदे, रितेश आंद्रे, वि. स. काळखेले, विनोद शेटे, संजय गडदे उपस्थित होते.

मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे आणि कौशल्याचे जगभरात कौतुक होत आहे. गेल्या १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने सुरू करावी. डबेवाल्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्यासक येत असतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असावी. त्यासाठी मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.